‘जेव्हा नवीन पोपट हा…’ ह्या गाण्यापासून ते अगदी ‘गणपती आला आणि नाचत गेला’ या गाण्यांपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला थिरकवणारे, लाडके महागायक आनंद शिंदे लवकरच दिग्दर्शकाच्या भूमिकेतून लोकांसमोर येत आहेत. साई इंटरनेशनल फिल्म आणि शिंदेशाही फिल्म प्रस्तुत ‘नंदू नटवरे’ या सिनेमाचे ते दिग्दर्शन करणार आहेत. हा धम्माल विनोदी चित्रपट असून, त्याच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात होत असल्याचे समजते. नुकतेच या सिनेमाचे जुहू येथील अजीवासन स्टुडियोमध्ये सिनेमातील लोकगीताच्या रेकोर्डिंगसह मुहूर्त करण्यात आला. हे लोकगीत खुद्द आनंद शिंदे यांनीच गायले असल्यामुळे, संपूर्ण महाराष्ट्राला खूळ लावणाऱ्या त्यांच्या गाण्यांमध्ये आता या लोकगीताचीदेखील लवकरच भर पडणार आहे.
या सिनेमाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे, आनंद शिंदे यांचे सुपुत्र डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांची प्रमुख भूमिका यात असून, या सिनेमाच्या निमित्ताने प्रथमच ते अभिनय क्षेत्रात उतरणार आहेत. तसेच आदर्श आणि उत्कर्ष या शिंदेबंधूंचे संगीतदेखील या सिनेमातील गाण्यांना लाभणार असल्याकारणामुळे, शिंदेशाही समृद्धीचा सांगीतिक थाट प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. शिवाय पहिल्यांदाच निर्मिती क्षेत्रात पाऊल टाकणाऱ्या ‘साई अॅग्रो टेक’ या संस्थेअंतर्गत उमेश जाधव, शंभू ओहाळ, विजय जगताप आणि अरविंद अडसूळ निर्मात्याची धुरा सांभाळणार असून, अनेक नामवंत कलाकरांची भूमिका यात असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत सध्या गुप्तता बाळगण्यात आली असून, सोलापूर, भोर, मुंबई चित्रनगरीत चित्रित होत असलेला हा सिनेमा महागायक आनंद शिंदे यांच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच ठरणार आहे.